विभागा विषयी

दुग्धव्यवसाय विकास विभाग सन १९५८ साली खालील उद्दीष्टाच्या पूर्तीसाठी स्थापन झाला.
१)शेतीला जोड धंदा म्हणून पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागातील ग्रामीण जनतेचा पिढीजात कौशल्याचा व स्वाभाविक प्रवृत्तीचा विकास करणे.
२)गाव, तालुका व जिल्हा पातळीवर दुध उत्पादकांच्या सहकारी संस्था स्थापन करणे.
३)सहकारी क्षेत्रातील दुग्धव्यवसायास प्रोत्साहन देऊन सहकारी दुग्धशाळांचे व संघाचे बळकटीकरण करणे व त्यास नियोजित धंदा करण्यास सक्षम बनविणे.
४)शासकीय क्षेत्रातील दुग्धव्यवसाय किफायतशीर करण्याचे दृष्टीने कार्यक्रम आखणे.
५)नियोजन करुन कृष व पुष्ठ काळात दुधाचे उत्पादन समपातळीवर ठेवणे.
६)शहरातील नागरिकांना सतत निर्भेळ व सकस दुधाचा पुरवठा किफायतशीर दराने करणे. दुग्धव्यवसाय विकास विभागाअंतर्गत दुग्धशाळांमार्फत दुधाची स्वीकृती, प्रक्रिया व वितरण करुन लोकांना दुध उपलब्ध करुन दिले जाते किंवा मोठया शहरातील दुग्धशाळांकडे प्रक्रिया करण्यासाठी व जनतेस दूध विक्री करण्यासाठी उपलब्ध करुन दिला जातो.

शितकरण केंद्र :-
ग्रामीण भागातून दूध गोळा करण्याचे काम प्राथमिक सहकारी दूध संस्थेकडून केले जाते. सदर दूधावर शितकरण केंद्रावर संकलित केल्यानंतर थंड करुन प्रक्रिया करण्यासाठी दुग्धशाळांकडे पाठविण्यात येते. दूध शितकरण केंद्र हे प्राथमिक सहकारी दूध संस्था व दुग्धशाळांमध्ये दुवा साधण्याचे काम करीत असते.

दूध भुकटी प्रकल्प :-
शासनाने शेतक-यांकडे उत्पादित होणारे सर्व दूध घेण्याची हमी दिलेली आहे. दूध हे नाशवंत पदार्थ असल्याने तातडीने त्याची विल्हेवाट लावणे आवश्यक असते. त्यामुळे शासनाने अतिरिक्त राहिलेल्या दुधाचे रुपांतरण दूध भूकटी आणि सफेद लोणी मध्ये करण्यासाठी ४ दूध भूकटी प्रकल्पाची उभारणी केलेली आहे. त्याची माहिती खालीलप्रमाणे आहे. मिरज -- २० मॅट्रिक टॅन
अकोला -- १५ मॅट्रिक टॅन
उदगीर -- १० मॅट्रिक टॅन
नागपूर -- ०५ मॅट्रिक टॅन

आरे दुग्ध वसाहत :-
आरे दुग्धवसाहतीची स्थापना १९४९ साली मुंबई शहरातील गुरे हलविण्याच्या उद्देशाने करण्यात आली. त्याकरिता ३१६० एकर जमीन संपादित करुन एकूण ३२ गोठे बांधण्यात आले आहेत. प्रत्येक गोठयात ५०० ते ५५० गुरांचे शास्त्रीयदृष्टया संगोपन करण्याच्या दृष्टीने सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. सरासरी एकूण १६,००० गुरे संगोपनार्थ आहेत. याव्यातिरिक्त आरे दुग्ध वसाहतीत रोपवाटीका असून त्यामार्फत रोपांची विक्री करण्यात येते.परवानाधारकांकडून प्रतिमहा प्रत्येक गुरासाठी परवाना शुल्क तसेच विज, पाणी वापर आणि पॅराग्रास क्षेत्राकरीता अशा आकारापोटी शुल्क वसूल करण्यात येते. आरे वसाहतीत नागरिकांसाठी अवलोकन केंद्र, पिकनीक स्पॉट, नौकाविहार अशा सुविधा उपलब्ध आहेत.
दुग्धव्यवसाय विकास विभा गातील वरिष्ठ स्तरावरील अधिकारी आरे दुग्ध वसाहतीचे व्यवस्थापनांचे कामकाज पाहतात त्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी, आरे असे संबोधले जातात.

प्रकल्प अधिकारी, दुग्धप्रकल्प दापचरी :-
दुग्धप्रकल्प दापचरीची स्थापना १९६० च्या सुमारास मुंबई उपनगरातील गुरे विस्थापन करण्याच्या उद्देशाने करण्यात आली. प्रकल्पाकरिता मुंबई-अहमदाबाद या महामार्गावर मुंबईपासून १५० किलो मीटर अंतरावर दापचरी येथे २६७७ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली. प्रकल्पाअंतर्गत विरोळी येथील नदीवर १३८० दशलक्ष क्षमतेचे मातीचे धरण बांधण्यात आले आहे. तथापि मुंबई उपनगरातील तबेलेधारकांनी दापचरी येथे स्थलांतर करण्यास उत्सुकता दर्शविली नाही. त्यामुळे प्रकल्पाच्या मूळ उद्देशात बदल करण्यात आला. सध्यास्थितीत प्रकल्पांतर्गत कृषिक्षेत्र योजना राबविण्यात येत असून १०० गावठाण व सलग्न १७० कृषिक्षेत्रांचा समावेश आहे. कृषिक्षेत्र योजनेअंतर्गत एक हेक्टर जमीन, बारा गायींचा गोठा व क्षेत्रधारकास राहाण्यासाठी जागा या सुविधा देण्यात आल्या आहेत. प्रकल्पातील जमिनीचा वापर भाजीपाला लागवड, रबर लागवड तसेच चिकू, आंबा इत्यादी फळांची कलमे, शोभिवंत झाडांची कलमे इत्यादीसाठी केला जातो. शासनाच्या फलोद्यान विभागामार्फत आंबा, चिकू, नारळ इत्यादी फळझाडांची कलमे वाटप कार्यक्रम कार्यान्वित आहे. प्रकल्प अधिकारी,दुग्धप्रकल्प दापचरी हे व्यवस्थापनांचे कामकाजासाठी जबाबदार अधिकारी आहेत.

पालघर :-
पालघर केंद्राची स्थापना १९५१ साली मुंबईतील तबेलाधारकांच्या भाकड म्हशीच्या संगोपनाचा प्रश्न सोडविण्यासाठी तसेच मुंबईतील गुरांना सुक्या चा-याचा पुरवठा करण्याच्या दृष्टीने करण्यात आली. त्याकरिता एकूण १४३२ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. त्यापैकी १२६२ हेक्टर जमिनीतून नैसर्गिक गवताचे उत्पादन होते. १९९१ पासून केंद्रात रोपवाटिका सुरु करण्यात आली. त्यात शोभिवंत झाडांची रोपे तसेच वनीकरणासाठी उपयुक्त निलगिरी, ऍकेशीया, रेनट्री, गुलमोहोर, आंबा, सिताफळ, लिंबू, फणस या फलोत्पादन वृक्षांची रोपे व कलमे तयार करण्यात येतात.

दुग्धशाळा विज्ञान संस्था,आरे :-
दुग्धशाळा विज्ञान संस्था, आरे येथे १२ वी शालांत परिक्षेनंतरचा दोन वर्षाचा दुग्धशाळा तंत्रविषयक अभ्यासक्रम १९६० पासून कार्यान्वित आहे. सदर संस्थेमध्ये प्रतिवर्षी ४० विद्यार्थ्यांना प्रवेश शासकीय धोरणानुसार देण्यात येतो. विद्यार्थ्यांची राहाण्याची सोय अद्ययावत न्यूझीलंड हॉस्टेल येथे करण्यात येते. प्राचार्य,दुग्धशाळा विज्ञान संस्था,आरे हे सदर संस्थेचे प्रमुख आहेत. सदर शिक्षण क्रम पशुविज्ञान व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर येथील विद्यापीठास सलग्न आहेत.

गुरांचा बाजार,पालघर :-
मुंबई येथील गुरांचा बाजार पालघर येथे स्थलांतरित करण्यात आलेला आहे. इतर राज्यातून विक्रीसाठी आणलेल्या जनावरांच्या तात्पुरती राहण्याची सोय गुरांचा बाजार मध्ये करण्यात येते. त्यासाठी प्रती जनावरामागे प्रती दिनीच्या आधारे फी आकारली जाते.

दुध व दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन :-
दूध व दुग्धजन्य पदार्थ तयार केले जात असून आरे सरिता आणि दूध केंद्रामार्फत सदर दूध व दुग्धजन्य पदार्थाची विक्री होत आहे.

गुरे नियंत्रण कायदा १९७६ :-
मुंबई शहरातील गुरांचे पालन करणे आणि ने-आण करणे याबाबत महाराष्ट्र शासनाने १९७६ साली अधिनियम केला आहे. सदर अधिनियमानुसार खाजगी किंवा व्यावसायिक कामासाठी गुरांचे पालन करण्याकरिता नियंत्रक, गुरे नियंत्रण, गोरेगांव (पूर्व), मुंबई यांचेकडून परवाना घेणे आवश्यक आहे. परवान्या शिवाय गुरांचे पालन करणे कायदयाने गुन्हा आहे. कालांतराने राज्यातील इतर शहरांमध्ये हा कायदा लागू करण्यात आलेला आहे. त्यामध्ये नागपूर अमरावती, औरंगाबाद, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, पुणे, ठाणे, पिंपरी-चिंचवड, कल्याण-डोंबिवली, नांदेड, नवी मुंबई या महानगरपालिकांचा समावेश आहे.

मराठी