निर्णय घेण्याची प्रक्रिया

शासकीय उपक्रम असल्याने, शासनाचे सर्व नियम व अधिनियम आणि कार्यप्रणाली या विभागास लागू आहेत. दुग्धव्यवसाय विकास विभागाअंतर्गत विविध कार्यालयांची कार्यप्रणाली/आखणी खालीलप्रमाणे आहे- दुग्ध उत्पादकांकडून दुध स्वीकृत करणे, दुधाचे संकलन, प्रक्रिया, उत्पादन व वितरण करणे, दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन व वितरण करणे, विभागास लागणारी सामुग्री खरेदी करणे, अधिकारी/ कर्मचारी यांचे वेतन व भत्ते अदा करणे, यंत्र व सामुग्रीची देखभाल दुरुस्ती व नवीन यंत्रसामुग्री बसविणे इ.

दुग्धशाळेत पर्यवेक्षकीय यंत्रणा खालीलप्रमाणे आहे.
दुग्धशाळेत अनेक विभाग आहेत. त्या-त्या विभागातील वरिष्ठ अधिकारी/कर्मचारी हा त्या विभागाच्या कुशल/अकुशल कर्मचा-यांमार्फत दैनंदिन कामकाज पार पाडत असतात आणि त्यानुसार दुग्धशाळा व्यवस्थापक यांना अहवाल सादर करतात.

दूध शितकरण केंद्र :-
शितकरण केंद्र प्रमुख त्या दूध शितकरण केंद्रातील दैनंदिन कामकाजाबाबत जबाबदार असतो. विविध सहकारी दूध संस्थांकडून स्वीकृतीसाठी येणा-या दुधाची गुणप्रत तपासण्याचे काम दुग्धशाळा रसायन शास्त्रज्ञ यांचे आहे. दुध शितकरण केंद्रावर प्राप्त होणारे दूध आणि इतर दुग्धशाळांना पुरवठा इ. बाबतचे सर्व नोंदी दुग्धशाळा पर्यवेक्षक तयार करीत असतात आणि त्यानुसार केंद्र प्रमुखाकडे अवलोकनार्थ सादर करतात. सदर माहिती केंद्र प्रमुख दुग्धशाळा व्यवस्थापक यांना सादर करतात.

दुग्धशाळा :-
दुग्धशाळेतील दैनंदिन कामकाजाची सर्वस्वी जबाबदारी दुग्धशाळा व्यवस्थापक यांची असते. दुग्धशाळेतील कामकाज अनेक विभागामार्फत चालविले जातात. उदाहरणार्थ उत्पादन, प्रक्रिया, वितरण, रुपांतर, अभियांत्रिकी, वाहतूक त्या विभागातील विभाग प्रमुखावर तेथील कामकाजाची जबाबदारी असते. दुग्धशाळेत दुधावर प्रक्रिया करुन दुध केंद्र आणि आरे सरिता केंद्रामार्फत समान्य ग्राहकापर्यंत उपलब्ध करुन दिले जातात. दुग्धशाळा व्यवस्थापक हे त्यांचा अहवाल प्रादेशिक दुग्धव्यवसाय विकास विभाग यांना सादर करतात. प्रादेशिक दुग्धव्यवसाय विकास अधिकारी दूध शितकरण केंद्राचा प्रस्ताव छाननी/ पडताळणी करुन त्यांच्या अहवाल आयुक्त दुग्धव्यवसाय विकास यांचे कार्यालयाकडे सादर करतात. दुग्धव्यवसायाला चालना देण्यासाठी शासन निर्देशानुसार उपाययोजना आखण्याचे काम त्या जिल्हयातील जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी यांची असते. शासकीय/सहकारी/खाजगी दुग्ध प्रकल्प आणि प्राथमिक सहकारी दुग्ध संस्था दूध संघ यांची पहाणी करणे व त्याचा अहवाल प्रादेशिक दुग्धव्यवसाय विकास अधिकारी यांना सादर करणे, प्रादेशिक दुग्धव्यवसाय विकास अधिकारी हे सदर अहवालाची पडताळणी करुन त्यांचा अहवाल आवश्यक त्या कार्यवाहीसाठी आयुक्त, दुग्धव्यवसाय विकास यांना सादर करतात. सदर कामामध्ये जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी यांना सहाय्यक जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी आणि सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (दुग्ध) हे सहाय्य करतात.

प्रादेशिक दुग्धव्यवसाय विकास अधिकारी :-
प्रादेशिक विभागातील कामकाज सुरळीतपणे पार पाडण्याची सर्वस्वी जबाबदारी प्रादेशिक दुग्धव्यवसाय विकास अधिकारी यांची असते. त्या त्या विभागातील वर्ग-३ मधील अधिकारी/कर्मचारी आणि वर्ग-४ मधील कर्मचा-यांची सेवा विषयक बाबींसाठी प्रादेशिक दुग्धव्यवसाय विकास अधिकारी हे सक्षम प्राधिकारी आहेत. प्रादेशिक प्रमुख म्हणुन त्यांना वित्तीय अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत. विभागाअंतर्गत येणा-या दुग्धशाळा/शितकरण केंद्र/कार्यालय इ. चे कामकाज व्यवस्थितपणे चालविण्यासाठी दुग्धशाळा अभियंता, सहाय्यक दुग्धव्यवसाय विकास अधिकारी, उप निबंधक सहकारी संस्था (दुग्ध), लेखा अधिकारी अंतर्गत लेखा परिक्षा अधिकारी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी हे प्रादेशिक दुग्धव्यवसाय विकास अधिकारी यांना सहाय्य करीत असतात. प्रादेशिक दुग्धव्यवसाय विकास अधिकारी यांना प्रदान केलेल्या वित्तीय आणि प्रशासकीय अधिकार क्षेत्राबाहेरील प्रस्ताव पुढील कार्यवाही/ मान्यतेसाठी आयुक्त दुग्धव्यवसाय विकास यांची कार्यालयाकडे सादर करीत असतात. त्यानुसार विभाग स्तरावर कार्यवाही केली जाते.

आयुक्त, दुग्धव्यवसाय विकास विभाग :-
आयुक्त, दुग्धव्यवसाय विकास हे दुग्धव्यवसाय विकास विभागाचे विभाग प्रमुख आहेत. विभागाचे कामकाज सुरळीतपणे चालविण्यासाठी खालील अधिकारी त्यांना सहाय्य करतात. उप आयुक्त (प्रशासन), दुग्धव्यवसाय विकास विभाग हे प्रशासकीय कामकाजात सहाय्य करतात. उप आयुक्त (उत्पादन व प्रापण), दुग्धव्यवसाय विकास विभाग हे दुधाचे उत्पादन व प्रापण संबंधी कामकाजात सहाय्य करतात. उप आयुक्त (प्रक्रिया व वितरण) हे दुधाचे प्रक्रिया व वितरण संबंधी कामकाजामध्ये सहाय्य करतात. उप आयुक्त (दुग्धशाळा अभियांत्रिकी) हे दुग्धशाळेच्या यंत्रसामुग्री व इतर तांत्रिक प्रकरणामध्ये सहाय्य करतात. उप आयुक्त (वित्तीय सल्लागार) हे विभागाच्या वित्तीय प्रकरणांमध्ये आयुक्त दुग्धव्यवसाय विकास विभाग यांना सल्ला देण्याचे व सहाय्य करण्याचे काम करीत असतात. सह निबंधक सहकारी संस्था (दुग्ध) ही प्राथमिक दुध सहकारी संस्था/तालुका दूध संघ/जिल्हा दुध संघ यांचे कामकाज सुरळीतपणे चालविण्यास सहाय्य करतात. जनसंपर्क अधिकारी हे दुग्धव्यवसाय विकास विभागातील विविध कार्यालये / विभागामध्ये समन्वय साधण्याचे काम करीत असतात आणि जनतेकडून प्राप्त होणा-या तक्रारींचे निवारण करण्याचे काम पार पाडतात. वरील सर्व अधिकारी आयुक्त दुग्धव्यवसाय विकास विभाग यांना प्रकरणे सादर करतात व शासनाच्या नियमानुसार निर्णय घेतले जातात.

 

मराठी